उस्मानाबाद : तक्रारदाराचे काम करण्यासाठी एक हजार रूपये लाचेची मागणी करून खाजगी व्यक्तीमार्फत स्विकारणाऱ्या कळंब तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिकासह दोघाविरूध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ही कारवाई आज दुपारी कळंब येथील तहसील कार्यालयात करण्यात आली.
लाचलचूपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेल्या तक्रारदारावर कळंब पोलीस ठाण्यात एनसी क्ऱ ५८५/२०१८ दाखल आहे़ कळंब पोलिसांनी तहसील कार्यालयात तक्रारदाराविरूध्द सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रस्ताव पाठविला होता़ सदरची १०७ ची कार्यवाही बंद करण्यास मदत करण्यासाठी म्हणून तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अमोल आण्णासाहेब हंकारे यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले होते़
या तक्रारीनुसार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा केली़ पोलीस अधीक्षक डॉ़ श्रीकांत परोपकारी, अधीक्षक बी़व्हीग़ावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनय बहीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला़ त्यावेळी कनिष्ठ लिपिक अमोल हंकारे यांनी खाजगी व्यक्ती किशोर नाना मगर याच्या मार्फत एक हजार रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़