कळंब : कोरोना माहामारीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. हे लसीकरण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ‘आयएमए’ सक्रिय सहभाग नाेंदविणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष डाॅ. रामकृष्ण लाेंढे यांनी दिली.
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात आयएमएचे डॉक्टर्स शासनाच्या दिशा निर्देशानुसार लसीकरण करणार आहेत. त्यासाठी लागणारे प्रशिक्षित डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, अतितात्काळ सेवा पुरविल्या जाणार असल्याचे डॉ. लोंढे यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटना तसेच देशातील आरोग्य विभागाकडून या लसींची विविध पातळीवर चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना लस १०० टक्के सुरक्षित असून कोणताही साइड इफेक्ट नाही. यासंबंधी नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. लसीबद्दल काही शंका-कुशंका असतील तर नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वांनी लसीकरण करून शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. लोंढे यांनी केले.