धाराशिव : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी कंत्राटी परिचारिका काम बंदचे हत्यार उपसले असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, जीएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप पर्यंत समायोजन करण्यात आले नसल्याने आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनने बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता, एक रुपयाची सुपारी सरकार झालं भिकारी, कोण म्हणंतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, एकच नारा कायम करा, बारा बाराची पूर्तता करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा मागण्यांनी जिल्हा कचेरी परिसर दणाणून सोडला हाेता. आंदोलनात जिल्हाभरातील कंत्राटी नर्सेस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.