लोहारा : लोहारा तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायत यापूर्वी १९८५ व १९९० ला दोन वेळा बिनविरोध काढण्यात आली होती. आताच्या निवडणुकीतही नऊ जागांपैकी सहा जागा बिनविरोध निघाल्या असून, तीन जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उर्वरित तिन्ही जागा बिनविरोध काढण्यासाठी गावपुढाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे २६ वर्षांनंतर पुन्हा ग्रामपंचायत बिनविरोध होणार का, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
लोहारा शहरापासून पाच किमी अंतरावरील मार्डी हे सुमारे तीन हजार लोक वस्तीचे गाव आहे. हे जिंदावली दर्गाहमुळे परिचित आहे; परंतु येथे राजकीय पारंपरिक दोन गट आहेत. या दोन्ही गटांत नेहमीच सत्तेसाठी राजकीय चुरस असते. निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर दोन्ही गटांकडून केला जातो. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत या दोन गटांत राजकीय सत्ता संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. निवडणुकीच्या निमित्ताने सतत होणाऱ्या हाणामाऱ्या, त्यातून बिघडणारे सामाजिक स्वास्थ्य या प्ररकारामुळे मार्डी गावची ‘अतिसंवेदनशील’ अशी नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे.
दोन्ही गटांतील टोकाच्या विरोधामुळे गावच्या समस्या कायम राहिल्याने नागरिकांना मूलभूत गरजांपासून वंचित राहाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष हळूहळू निवळत चालला आहे. त्यामुळे गावच्या राजकारणात बदल घडत आहेत. त्यामुळे १९८५ व १९९० नंतर
यावर्षीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न ग्रास्थांकडून सुरू झाला आहे. यासाठी काही बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे सहा जागा बिनविरोध काढण्यात यश आले आहे.
परंतु प्रभाग एकमधील अनुसूचित जातीच्या महिलेसाठीची एक व सर्वसाधारण पुरुष एक तर प्रभाग दोनमधील सर्वसाधारण महिलेच्या एक अशा तीन जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाली आहेत. या उर्वरित तिन्ही जागा बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्ज मागे घ्यावे, यासाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यात येत आहे. नरदेव कदम, अप्पासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील, राम कदम, सादीक शेख, संपत देवकर, प्रवीण पाटील, धनंजय देवकर, शिवाजी यमगर, बाळू देवकर, परमेश्वर कदम आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
चौकट...
हे आले बिनविरोध
येथील प्रभाग एकमधून सर्वसाधारण महिला गटातून इंदूबाई प्रभाकर सरवदे, प्रभाग दोन : मागास प्रवर्ग पुरुष गटातून योगेश मारुती देवकर, अनुसूचित जाती पुरुष गटातून महादेव गणपती मिसाळ, प्रभाग तीन : मागास प्रवर्गातील महिला गटातून उषाबाई अशोकराव पाटील, सर्वसाधारण महिला गटातून भागीरथी सुभाष देवकर, सर्वसाधारण पुरुष गटातून रमेश चंद्रकांत कदम यांचे प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने हे सहा जण बिनविरोध आले. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.