समुद्रवाणी (उस्मानाबाद) : ‘टिकटॉक’च्या गैरवापराने एकिकडे त्यावरील बंदीची चर्चा झडत असतानाच या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोन ‘बिछडे भाई’ तब्बल ७ वर्षांनी पुन्हा भेटल्याची घटना बुधवारी घडली़ रुईभर या गावातून बेपत्ता झालेला भोळसर व्यक्तीचा पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास लावून बुधवारी त्यास भावाच्या स्वाधीन केले.
उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथील एक मतिमंद युवक दत्तात्रय सोपान माने (वय ३१) हा ३१ जून २०१२ पासून बेपत्ता होता. त्याचा भाऊ चांगदेव सोपान माने याने तशी तक्रार बेंबळी पोलिसांत दिलेली होती. प्रयत्न करुनही त्याचा अनेक वर्षे पत्ता लागला नाही़ दरम्यान, ३० जुलै रोजी त्याच्या कुटूंबियांना दत्तात्रय याच्यावर बनवण्यात आलेला एक टिकटॉक व्हिडीओ प्राप्त झाला़ त्यांनी तातडीने बेंबळी ठाण्यातील कर्मचारी शिवराज बारगजे यांच्या निदर्शनास तो व्हीडिओ आणून दिला़ बारगजे यांनी सहायक निरीक्षक उत्तम जाधव यांच्या सूचनेप्रमाणे सायबर सेलच्या उपनिरिक्षक क्रांती ढाकणे यांना त्याच दिवशी याबाबतची माहिती दिली़ ढाकणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने व्हिडीओचा बारकाईने तपास केला.
यात एका चारचाकी वाहनाचा क्रमांक आढळून आला़ या क्रमाकांच्या आधारे वाहनमालकाचा पत्ता व मोबाईल क्रमांक त्यांनी शोधून काढला़ संबंधित मोबाईल क्रमांकचे लोकेशन मिळविले असता, ते निमोणी (ता. शिरुर, जि. पुणे) या गावातील असल्याचे स्पष्ट झाले़ यानंतर पोलीस अधीक्षक आऱ राजा, अपर अधीक्षक संदीप पालवे यांच्या सूचनेनुसार निमोणी गावात एक पोलीस पथक तातडीने पाठवून देण्यात आले़ या पथकाने निमोणीच्या महिला पोलीस पाटील इंदिरा बापू जाधव यांच्या मदतीने एका शेतातून बेपत्ता दत्तात्रयला मंगळवारी ताब्यात घेतले़ रातोरात प्रवास करीत या पथकाने बुधवारी सकाळी बेंबळी ठाणे गाठले़ यानंतर दत्तात्रयला त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले़ तब्बल सात वर्षानंतर झालेल्या भेटीने दत्तात्रयचे कुटूंबिय गहिवरले होते़.