उस्मानाबाद : वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये सामावून घेतल्यानंतर यातील अनेकांचे डीटीएड झालेले नव्हते. कालांतराने त्यांनी डीटीएड पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल केला. परंतु, दाेन वर्षांपासून त्यावरील धूळ झटकलेली नव्हती. त्यामुळे संबंधित शिक्षक शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवित हाेते. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले. यानंतर अवघ्या एका दिवसात हा प्रश्न निकाली काढला.
गाेरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे एकही बालक शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिले जाऊ नये, यासाठी वाडी, वस्त्यांवर वस्तीशाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. कालांतराने या शाळा जिल्हा परिषद शाळांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. परिणामी वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला हाेता. आम्हांला रूजू करून घेण्यात यावे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर कुठे शासनाने संबंधित शिक्षकांना अप्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनश्रेणीवर रूजू करून घेतले. कालांतराने संबंधित शिक्षकांनी डीटीएड पूर्ण केले असता, प्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी मिळावी, यासाठी प्रस्ताव दाखल केला. परंतु, हा प्रस्ताव मागील दाेन ते अडीच वर्षांपासून शिक्षण विभागाच्या कपाटात कुलूपबंद हाेता. परिणामी हे शिक्षक सातत्याने कार्यालयाचे उंबरठे झिजवित हाेते. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. दरम्यान, हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्यासमाेर आल्यानंतर त्यांनी अवघ्या एका दिवसात संचिका मागवून घेऊन प्रशिक्षित शिक्षकांची वेतनश्रेणी बहाल केली. त्यामुळे संबंधित शिक्षकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
चाैकट...
यांना मिळाला न्याय...
भूम तालुक्यातील तिंत्रज शाळेवरील दादासाहेब गहिणीनाथ चव्हाण, कुन्सावळी शाळेवरील राबसाहेब बबन पवार, शिराळा येथील चंद्रकला महादेव वाघमाेडे, गाेसावीवाडी येथील सुधर्म दत्तात्रय भाग्यवंत, चिवरी येथील धनंजय शिवाजी ठाेंबरे आणि कुंभारी यथील वासंती उमाजी गायकवाड या शिक्षकांना मागील काही वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना प्रशिक्षित वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.