१४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी काळात अत्यावश्यक वस्तूचे दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, जिल्ह्यात प्रतिदिन कोरोना बाधितांचा आलेख प्रतिदिन वाढत आहे. असे असतानाही नागरिक खरेदीचे कारण सांगत घराबाहेर येत आहेत. वर्दळ कमी करण्याच्या आनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी किराणा दुकाने, दूधविक्री,भाजीपाला, फळे, बेकरी, शेतीविषयक वस्तूंचे दुकाने, पार्सल सेवा दुपारी २ वाजेनंतर बंद ठेवण्याबाबत १६ एप्रिल रोजी आदेश जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शनिवारी पहिल्याच दिवशी उस्मानाबाद शहरात दुपारी २ वाजेनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. दुकाने बंद असल्याने नागरिकांनी घरात बसणे पसंत केले. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
दवाखाने, मेडिकल सुरू...
रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता दवाखाने, मेडिकल, वैद्यकीय विमा कार्यालय पूर्णवेळ सुरू ठेवण्यास मुभा दिल्याने या सेवा दिवसभर पूर्णवेळ सुरू होत्या. शिवाय, ॲटोरिक्षा, मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, एटीमएम, विद्युत सेवा, गॅस सिलिंडर पुरवठा आदी घटकांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे पोलीस बाहेर फिरणाऱ्यांचे ओळखपत्राची तपासणी करताना आढळून आले.
पोलीस गस्तीवर
शहरात संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाचे आदेश आहेत. तरीही काही नागरिक खरेदीचा बहाणा सांगून घराबाहेर पडत असतात. दुपारी दोननंतर शहरात फिरणाऱ्या नागरिकांना जरब बसावी, याकरिता पोलिसांनी शहरात फिरून पाहणी केली. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला.