उमरगा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, रिकव्हरी रेटही वाढत आहे. कोरोना संसर्गाचा दर १८.६२ टक्के आहे. आजवर ४ हजार १२२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, यातील ३ हजार ४०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे रिकव्हरी रेट ८५ टक्के झाला आहे. आतापर्यंत १५९ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर २.५ टक्के झाला आहे.
उमरगा तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ३२० रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये १ हजार ७३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या टेस्टमधील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १८.६३ झाला आहे, तर १० हजार ३२४ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यापैकी १ हजार ७६२ कोरोना पॉझिटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिटी रेट १७.०६ वर पाेहाेचला आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट वाढत चालला आहे. आतापर्यंत तालुक्यात ४ हजार १२२ कोरोनाबाधितांची संख्या झाली असून, यातील ३ हजार ४०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला तालुक्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्के झाला आहे, तर दुसरीकडे आजवर १५९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयात १२० मृत्यू झाले आहेत. यामध्ये ६० वर्षांवरील वृद्धांची संख्या ७३ आहे. इतर ठिकाणी ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील मृत्यूचा दर २.५ टक्के झाला आहे. सध्या मृत्यूचा दर वाढत असल्याने चिंता वाढत आहे.
पाॅईंटर..
मुरूम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या ३५ रॅपिड अँटिजेन टेस्टपैकी १२ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात ५१ अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यातील १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १२७ पैकी ४३ व्यक्तींच्या ॲंटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. उपजिल्हा रुग्णालयातून पाठवलेल्या ३० स्वॅबचे अहवाल आले. यातील १० व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, मुरूमचे वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे यांनी दिली.