येडशी (जि. धाराशिव) - आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावागावात लाेकप्रतिनिधींना गावबंदीचे बॅनर झळकत असतानाच ऐन दसऱ्याचा मुहूर्त साधत येडशी येथील मराठा बांधवांनी सर्वपक्षीय प्रतिकात्मक पुतल्याचे दहन केले. जाेपर्यंत आरक्षण मिळत नाही, ताेवर काेणत्याही पक्षाचा मेळावा वा बैठकीला जायचे नाही, असा ठरावही करण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे पाटील यांना लढा उभा केला आहे. सर्वसामान्य मराठा बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मात्र, सर्वपक्षीय मराठा नेते ठाेस भूमिका घेताना दिसत नाहीत. आरक्षण देण्यासाठी महिनाभराचा कालावधी सरकारने मागून घेतला. मात्र, आरक्षणाच्या बाबतीत निर्णय झाला नसल्याचे सांगत मंगळवारी मराठा बांधव आक्रमक झाले. येडशी येथील शहाजीराजे चाैकात सर्वपक्षीय प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्यास रावण असे नाव देण्यात आले. या पुतळ्याचे जाेरदार घाेषणाबाजी करीत दहन करण्यात आले. जाेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ताेवर काेणत्याही पक्षाची बैठक, मेळावा वा माेर्चात सहभागी व्हायचे नाही, असा निर्धारही मराठा बांधवांनी केला.