उस्मानाबाद - शहरातील जिजाऊ चाैक ते बाेंबले हनुमान चाैक या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी अभिजित पतंगे यांच्या नेतृत्वाखाली उपाेषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून ठाेस निर्णय न झाल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही हे आंदाेलन सुरू हाेते. दरम्यान, या आंदाेलनास आता मनसेनेही पाठिंबा दिला आहे.
उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चाैक (बार्शी नाका) ते बाेंबले हनुमान चाैक या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. थाेडाबहुत पाऊस झाला तरी या रस्त्याला डबक्याचे स्वरूप येते. सदरील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अभिजित पतंगे यांच्यासह नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत हाेता; परंतु प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २७ जुलैपासून पतंगे यांच्या नेतृत्वाखाली उपाेषण सुरू करण्यात आले आहे. या आंदाेलनात परिसरातील नागरिकही सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून ठाेस आश्वासन न मिळाल्याने हे आंदाेन दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही सुरूच हाेते. या आंदाेलनास मनसेच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला आहे. या अनुषंगाने पालिका मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राहुल विलासराव बचाटे, कुणाल महाजन, नीलेश जाधव, आदित्य लगदिवे, धीरज खोत, दीपक पवार, ओंकार गुळवे, प्रदीप चौगुले, सोमनाथ जाधव, अविनाश चौगुले आदींची उपस्थिती हाेती.