ऐन लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी अजित पवार गटात आलेल्या अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धाराशीवच्या उमेदवार असलेल्या पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी रॅलीला परवानगी घेतली होती, परंतु नंतरच्या अजित पवारांच्या सभेला परवानगी घेतली नव्हती. यामुळे त्यांच्यावर सुमारे दीड महिन्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उरलेले आहेत. राज्यात काय होईल, देशात काय होईल, वारे फिरतील की मोदी बहुतमताने निवडून येतील आदी चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांचीही धाकधूक वाढू लागली आहे.
अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेला अजित पवार, मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. या मतदारसंघातून लोकसभेसाठी ३१ उमेदवार उभे आहेत.
दीर - भावजयीमध्ये लढत...२००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती. या दोघांतील कौटुंबिक, राजकीय कलहाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतील राणाजगजितसिंह पाटील व ओम राजेनिंबाळकर यांनी आजवर कायम राखला. आता यावेळी मात्र, ओमराजेंना राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिले आहे. आजवरचा इतिहास पाहता ही लढत पुन्हा एकदा अत्युच्च टोकाची होण्याची चिन्हे असून, वंचित बहुजन आघाडीमुळे यात भर पडली आहे. यंदाचा पराभव कोण्या एकाला विजनवासात घेऊन जाणारा असल्याने दोन्हीकडे जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे.