बालाजी अडसूळ
गरजा भागवण्यासाठी कर्ज काढले... ते फेडण्यासाठी जिद्दीने कष्ट झेलत असताना अपघात झाला...पुढे ना शरिरात कष्टाची रग राहिली ना, भूमिहीन असल्याने उत्पन्नाची साथ. अशी विवंचना नशिबी आलेल्या तालुक्यातील मस्सा ख येथील एका शेतमजूराने 'देणी फेडायची आहेत, पण यासाठी एक किडणी विकू द्या' अशी आर्त विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
तालुक्यातील मस्सा ख येथील जनार्धन रामचंद्र राऊत या 42 वर्षीय शेतमजूराच्या संसाराची कथा एक 'शोकांतीका' बनली आहे. भूमिहीन असलेले जनार्धन हे मोठ्या जिद्दीने मजुरी करून आपली उपजिविका भागवत होते. मिळेल ते काम व यासाठी हाडाची काड करत आलेला दिवस काढत होते. उत्पन्नाचा अन्य कोणताही सोर्स नसल्याने त्यांना कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता.
तारुण्यात परिस्थितीशी असा अव्याहत संघर्ष सुरु असतांना अचानक त्यांच्यावर एक संकट कोसळलं. एका शेतकऱ्याकडे मजूर म्हणुन काम करत असतांना ते पन्नास फूट खोल विहिरीत पडले. यात दोन्ही पायांना गंभिर दुखापत झाली. एका पायात शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला. हात, पाय आणि कष्टाळूपणा हेच भांडवल असलेले जनार्धन या दुर्घटनेपासून एकाअर्थाने मन अन् शरिराने अपंग झाले.
नियतीने लावलेल्या संकटाचे दुष्टचक्र त्यांची पाठ सोडण्यास तयार नव्हते. याकाळात संसारातील गोडीमध्ये अचानक बिघाडी झाली. एकल पुरूष म्हणून संघर्षाशी दोन हात करण्याची नौबत आली. मुलाबाळांचा आधार मिळेल ही आशा करणंही नशिबात नव्हतं. यातच मातीच्या छप्परात राहत असणाऱ्या जनार्धन यांनी पत्र्याचे पक्के घर बांधले. यातच शारिरीक असर्मतथेमुळे दवापाण्यावर मोठा खर्च करावा लागला.
दरम्यान, त्यांच्या कष्ट करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. गरज व इच्छा असतांनाही ते कष्ट करण्यास असमर्थ झाले. यासाठी एका खाजगी फायन्सास व खाजगी लोकांकडून काढलेल्या कर्जाचे आकडे फुगत गेले. एकीकडे हा आकड्याचा आलेख वृद्धीगंत होत असतांना, दुसरीकडे मजूरीतून येणाऱ्या चार पैशावरही पाणी पडले. त्यामुळे आता 90 वर्षाच्या आईसमवेत जनार्धन राऊत हे या देणेकरांच्या तगाद्याला तोंड देत आहेत. देण्याची विच्छा आहे, मात्र परिस्थितीपुढे ते हतबल आहेत. त्यामुळे काय करावे अन् कसे करावे असा अनाहूत प्रश्न पडलेल्या जनार्धन राऊत यांच्या प्रश्नावर समाज नावाची व्यवस्था तरी काही तोडगा काढणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मला किडणी विकायची अनुमती द्या.....
दरम्यान अपघाताने दुर्बल झालेले शरीर, यामुळे कष्टावर आलेल्या मर्यादा, यातच भूमिहीन असल्याने उत्पन्नाची कोणतीच शाश्वती नसल्य्ने हतबल झालेल्या जनार्धन रामचंद्र राऊत यांनी 11 नोव्हेंबरला जिल्हाधिकारीउस्मानाबाद यांच्याकडे किडणी विकण्याची परवानगी द्यावी, अशी ह्रदयद्रावक मागणी केली आहे. गत एक महिन्यापासून राऊत हे अशी अनुमती मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
मान्यताप्राप्त फायनान्सचा फास.... ग्रामीण भागात फोफावलेल्या खाजगी सावकारीचा फास वारंवार चर्चेला येतो. यावर अधुनमधून तक्रारीअंती कारवाई ही होते. मात्र, अनुज्ञप्ती घेवून फायनान्सच्या नावाखाली वित्त पुरवठा करणाऱ्या फायनान्स अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करत अनेकांना फास लावत आहेत हे मात्र दुर्लक्षित केले जात आहे. यातूनच जनार्धन राऊत यांच्यासारखी उदाहरण समोर येत आहेत.
जनार्धन रामचंद्र राऊत. मस्सा ख. ता. कळंब"मी भूमिहीन मजूर आहे. एका अपघाताने शारिरिक कष्टावर मर्यादा आल्या आहेत. यातच सात लाखांचे देणं झालं आहे. इतर कोणाताही आधार नाही. मला देणी फेडायची आहेत. परंतु, शक्य नसल्याने मी किडणी विकायची अनुमती मागितली आहे. अशी परवानगी मिळाली तर मी एका किडणीवर उर्वरीत आयुष्य घालवेल. कोणाताच इतर आधार नसल्याने मी हा सर्व विचार करुनच निर्णय घेतला आहे"