धाराशिव : भुयारी गटारीसाठी खोदण्यात आलेल्या चरीमुळे माती रस्त्यावर पडून धाराशिवकरांना चिखलाचा मोठा सामना करावा लागत आहे. यातच रात्रीपासून सुरू झालेल्या मध्यम पावसाने एक वेगळीच कोंडी निर्माण केली आहे. रस्त्यावरील चिखल काहीसा धुऊन जाताच चरी खचू लागल्याने त्यात वाहने अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भुयारी गटार योजनेसाठी धाराशिव शहरातील अंतर्गत रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम झाल्यानंतर तेथे पाईप टाकून चरी बुजविण्यात आल्या. मात्र, त्यांची व्यवस्थित दबई झालेली नाही, हे कालच्या पावसाने उघडकीस आणले आहे. आतापर्यंत नागरिकांना चिखल, राड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सोबतीलाच चर खचू लागल्याने त्यात वाहने रुतून रस्ता जाम होणे, वाहनांचे नुकसान होणे, असे प्रकारही मंगळवारी पाहायला मिळाले. शहरातील नाईकवाडी नगरातून स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक चर खचल्याने यात तीन मोठी वाहने रुतून बसली. यामध्ये एका रुग्णवाहिकेचा आणि मुरुम टाकण्यासाठी आलेल्या टिप्परचाही समावेश आहे. जवळपास दोन ते तीन फूट खाली वाहनांची चाके अडकल्याने अक्षरश: जेसीबीद्वारे वाहने उचलून बाहेर काढण्याची वेळ आली.
नेमके काय घडले..?स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नाल्या काही ठिकाणी बुजविण्यात आल्या आहेत. यामुळे बाजूच्या मोकळ्या जागेतून येणारे पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावरूनच वाहू लागले. या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रस्त्याच्या मधोमध खोदण्यात आलेल्या चरीत पाणी मुरून ही जागा भुसभुशीत झाली व त्यात येथून ये-जा करणारी वाहने अडकू लागली.