(फोटो - बाळू स्वामी ३१)
ईट : भूम तालुक्यातील ईट येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या नागेवाडी चाैक ते पखरूड या अंतरामध्ये अगोदरच मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातच जलवाहिनीला गळती लागल्याने या खड्ड्यांत पाणी साचून राहत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
भूम तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या ईट येथे खरेदी-विक्रीसाठी आसपासच्या १५ ते २० गावांतील ग्रामस्थांची दररोज वर्दळ असते. येथील डोकेवाडी जोडरस्ता, नागेवाडी चाैक, पाथरूड चाैक ते पखरूड फाटा या दोन कि.मी. अंतरामध्ये रस्त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची अंतर्गत जलवाहिनी आहे. या जलवाहिनीमध्ये नेहमीच गळती होते; परंतु तिची दुरुस्ती वेळेवर न झाल्याने हे पाणी डांबरी रस्त्यावर साचते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्या बुजल्या. खड्डे बुजविण्याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता व जलवाहिनीच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.