कळंब (जि. धाराशिव) : मराठवाड्याला ‘स्वंतत्र राज्याचा दर्जा’ द्यावा अशी मागणी करत कळंब येथे दाखल झालेली रथयात्रा रविवारी संभाजी ब्रिगेडकडून उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून जाेरदार घाेषणाबाजीही केली. त्यामुळे चाैकात काहीकाळ तणावसदृश्य परिस्थिती हाेती. दरम्यान, ‘रथयात्रेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव’ असल्याचा आराेप यावेळी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला.
स्वंतत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची ‘मराठवाडा मुक्ती मोर्चा’ ही रथयात्रा रविवारी कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली असता, संभाजी ब्रिगेडने या रथयात्रेस व त्यामागील भूमिकेचा तीव्र विरोध करीत ही रथयात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काळे झेंडे दाखवत रथयात्रा समिती पदाधिकाऱ्यांच्या भाषणात व्यत्यय तर आणला, शिवाय तीव्र शब्दात निषेध नोंदवत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाही दिला. यामुळे काहीकाळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. संभाजी ब्रिगेडचा विरोध पाहता रथयात्रा पुढे बीड जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली. याप्रसंगी प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय कवडे, ज्ञानेश्वर कुरडे पाटील, विलास गुठांळ, अशोक चोंदे, पंकज भिसे, इम्रान मिर्झा, अमोल पवार, शुभम पवार, शिवलिंग लोखंडे, शरद जाधव, दत्तात्रय पवार, वैभव जाधव आदी सहभागी झाले होते.