सोनारी (उस्मानाबाद ) : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका पशु-पक्षांनाही बसत आहे़ या दुष्काळाच्या झळा माकडांना बसू नयेत यासाठी तीर्थक्षेत्र सोनारी (ता़परंडा) येथील सचिन सोनारीकर हा युवक प्रयत्न करीत आहे़ सचिन सोनारीकर हा मागील साडेतीन वर्षापासून गावातील दीड हजारावर माकडांना खाद्य, पाणी पुरविण्याचे काम अखंडपणे सुरू आहे़
तीर्थक्षेत्र सोनारी येथील श्री काळ भैरवनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविक येतात़ अनेक भाविकांचे श्री काळ भैरवनाथ हे कुलदैवत आहे़ त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ येथे वर्षभर कायम असतो़ तीर्थक्षेत्र सोनारी व परिसरात तब्बल दीड हजारावर माकडे आहेत़ काही वर्षापूर्वी अस्वच्छ पाण्यामुळे माकडे दगावल्याची घटना येथे घडली होती़ शिवाय सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळामुळे माकडांना खाद्य, पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.
माकडे मरू नयेत, त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी सोनारी येथील सचिन सोनारीकर याने पुढाकार घेतला आहे़ सचिन मागील साडेतीन वर्षापासून माकडांना खाद्य, पाणी पुरवठा करीत आहे़ माकडांना शेंगदाणे, फुटाणे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, बटाटे, टमाटे, बिस्किटे, केळी आदी प्रकारचे खाद्य लागते. सचिन सोनारीकर कधी स्वखर्चाने तर कधी मित्र, भाविकांच्या मदतीने माकडांना हे खाद्य उपलब्ध करून देत आहे़
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ या पार्श्वभूमीवर मुक्या जनावरांची सोय होणे गरजेचे आहे़ यात सचिनचा हा उपक्रम अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे़ त्यामुळे अनेक भाविक, नागरिक, शासकीय अधिकारी त्याच्या या उपक्रमात मदतीचा हात पुढे करतात़ माकडांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी तो हातपंपातून पाणी उपसून टफात ठेवतो़ ठिकठिकाणी त्याने पाण्याचे मोठ मोठे टफही ठेवले आहेत़ एकूणच दुष्काळी स्थितीत माकडांसाठी प्रयत्न करणाऱ्या सचिनचा हा उपक्रम ग्रामस्थांसह भाविकांमध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे़
अनेकांची होते मदत मुक्या प्राण्यांची सोय व्हावी, यासाठी मी त्यांना खाद्य, पाणी पुरवठा करीत आहे़ या कामी भाविक, ग्रामस्थांसह अनेकांची मदत मिळते़ मला मानसिक समाधान मिळत असल्याने मी हे काम करीत असल्याचे सचिन सोनारीकर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.