धाराशिव : वडिलोपार्जित प्रॉपर्टी ग्रामसेवकाने परस्पर बनावट कागदपत्रे बनवून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप करीत परंडा तालुक्यातील पिंपळवाडी (चांदणी) येथील बाळासाहेब होरे व अनिता होरे हे गुरुवारपासून धाराशिव येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत.
उपोषणकर्ते म्हणाले, आम्ही माळशिरस तालुक्यातील श्रीपूर (महाळुंग) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहोत. गावी नसताना तत्कालीन दोन ग्रामसेवकांनी बनावट कागदपत्रे बनवून पिंपळवाडी (चांदणी) येथील वडिलोपार्जित १० गुंठे जागा भाऊ व चुलत भावाच्या नावे केल्याचा आरोपही बाळासाहेब होरे यांनी केला. जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी याबाबत निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने उपोषणास बसावे लागल्याचे ते म्हणाले. जागा परस्पर दुसऱ्या नावावर करणारे पिंपळवाडीचे तत्कालीन दोन ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, हडप केलेली वडिलोपर्जित प्रॉपर्टी ताब्यात देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी लावून धरली होती. मागणी मान्य झाल्याशिवाय, उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.