उस्मानाबाद : पावसाळा असाे की उन्हाळा. विजेचा लपंडाव ग्राहकांच्या नशिबी असताेच. विशेषत: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बारा-बारा तास पूर्ववत हाेत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थी, वाडी-वस्त्यांवरील रहिवाशांना स्रोतांना पाणी असूनही विजेअभावी टंचाईचा सामना करावा लागताे. ही बाब लक्षात घेऊन आता पाणीपुरवठा विभागाकडून १८८ याेजनांसाठी साेलार पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. आजवर ४९ याेजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शाळा, अंगणवाड्या तसेच वस्त्यांना वीजपुरवठा खंडित असतानाही पाणीटंचाईला ताेंड द्यावे लागणार नाही.
अंगणवाडी तसेच शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी विविध याेजना तसेच ग्रामस्थांनी लाेकसहभागातून कूपनलिका घेतल्या आहेत. बहुतांश कूपनलिकांना पाणीही मुबलक आहे. त्या ठिकाणी विद्युत पंपही बसविले आहेत; परंतु उन्हाळाच नव्हे, तर पावसाळा तसेच हिवाळ्यातही ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असताे. पावसाळ्यात व हिवाळ्यात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करते. कारण वादळी वाऱ्यासह पाऊस झाला की, तारा तुटून वा अन्य तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित हाेताे. एकदा का वीज खंडित झाली की, बारा-बारा तास पूर्ववत हाेत नाही. हिवाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा वापर वाढताे. परिणामी, वीज पंधरा मिनिटेही सुरळीत राहत नाही. महावितरणच्या या कारभाराचा फटका केवळ शेतकऱ्यांना बसताे असे नाही तर अंगणवाडी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना या समस्येला सामाेरे जावे लागते. कूपनलिकेसारख्या स्रोतांना मुबलक पाणी असूनही केवळ वीज खंडित राहिल्याने चिमुकल्यांना पाणी मिळत नाही. वाडी-वस्त्यांवर वास्तव्य करणाऱ्या लाेकांनाही या समस्येला ताेंड द्यावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने शाळा तसेच अंगणवाड्या व वस्त्यांवरील कूपनिलकांवर साेलार पंप बसविण्याचा निर्णय घेतला हाेता. यासाठी तरतूद उपलब्ध हाेताच १८८ याेजनांना मंजुरी देण्यात आली. थाेडाही विलंब न लावता पाणीपुरवठा विभागाकडून ४९ याेजनांचे अंदाजपत्रक तयार करून ते विरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीसाठी औरंगाबाद येथे पाठविले आहे. संबंधित कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळताच, कामे हाती घेण्यात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चाैकट
काेणत्या तालुक्यातीत किती याेजना?
तालुका याेजनांची संख्या
उस्मानाबाद ०३
भूम ३१
कळंब ०५
लाेहारा ०५
परंडा ८२
तुळजापूर २८
उमरगा १५
वाशी १९
एकूण १८८
काेट...
पाणीपुरवठा विभागास निधी मंजूर झाल्यानंतर सुमारे साेलार पंपासाठी १८८ पाणीपुरवठा याेजनांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आजवर ४९ याेजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम संपून ते वरिष्ठ कार्यालयास सादर केले आहे. उर्वरित अंदाजपत्रके तयार करण्याचे कामही सुरू आहे. सदरील कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शाळा, अंगणवाड्या तसेच वस्त्यांना भारनियमनाच्या काळातही पाणी उपलब्ध हाेईल.
-हिराकांत सर्जे, अभियंता, जिल्हा परिषद.