उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील देव कुरूळी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनास घटसर्प आजाराची लागण झाली आहे. मागील चार दिवसांत पाच जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत.
देव कुरूळी गावातील शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. त्यामुळेच पशुधनाची संख्याही साडेचार हजाराच्या घरात आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून गावातील पशुधनामध्ये घटसर्पची साथ पसरली आहे. अनेकांच्या जनावरला घटसर्पसदृश्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चार दिवसांमध्ये या आजाराने पाच जनावरे दगावली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच गावांमध्ये पशुधनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. असे असतानाही घटसर्प या रोजागाची साथ पसरल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या ओहत. दरम्यान, सध्या पशुचिकित्सालांमध्ये औषधांचा तुटवडा जानवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून बाहेरून औषधे आणावी लागत आहेत.
पशुधन पर्यवेक्षकाची जागा रिक्त देवकुरुळी हे गाव पिंपळा खुर्द येथील पशुवैद्यक दवाखान्यांतर्गत येते. या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाचे पद मंजूर आहे. परंतु, मागील तीन महिन्यांपासून ही जागा रिक्त आहे. एखाद्या आजाराची साथ पसरल्यानंतर शेतकऱ्यांना गैैरसोयीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सदरील रिक्त पद तातडीने भरावे, अशी मागणी होत आहे.