उस्मानाबाद : शहरातील काका नगर भागात राहणाऱ्या एका दांम्पत्यास समाजातून बहिष्कृत करीत त्यांना केलेला दंड वसूल करण्यासाठी जातपंचायतीच्या पंचांनी ( Jat Panchayat) अत्यंत घृणास्पद वर्तन केल्याचे समाेर आले आहे. त्रासाला वैतागून पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीने आपल्या तक्रारीत पंचाचा पाढा वाचला असून, याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री आनंदनगर ठाण्यात गुन्हा (Crime in Osmanabad ) दाखल झाला.
पळसप येथील सोमनाथ व सुनिता काहे हे दांम्पत्य उस्मानाबादेतील काका नगरात वास्तव्याला होते. जवळपास आठ वर्षांपूर्वी त्यांच्याकडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने जातपंचायतीने त्यांना चार एकर शेती व ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या पैश्यांच्या वसुलीसाठी जातपंचायतीतील लोक त्यांना सातत्याने त्रास देत होते. वसुलीच्याच अनुषंगाने १८ सप्टेंबर रोजी पुन्हा पंचायत बसविण्यात आली होती. याठिकाणी पंच म्हणून राजा गुलाब चव्हाण, मोतीराम आगल्या काळे, भागवत पवार, पापा शिंदे, रामदास चव्हाण, नाना काळे हे बसले होते. याशिवाय, जवळपास २५ इतर व्यक्तीही तेथे होत्या. त्यांनी वसुलीसोबतच सोमनाथचे मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याचे व त्याने पोलिसांना मदत केल्याचे आरोप करुन दुसरी शिक्षा लावली. यानुसार सोमनाथला त्यांनी विष्ठा खाण्यास भाग पाडले. त्याच्या पत्नीस नग्न करुन मारहाण केली. या प्रकाराने व्यथित झालेल्या सोमनाथ व सुनिता यांनी २४ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले असता, सुनिताची प्रकृती सुधारली. मात्र, सोमनाथची प्रकृती खालावत जावून त्याचा ५ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यामुळे जातपंचायतीच्या लोकांमुळेच पतीने आत्महत्या केल्याची तक्रार सुनिता काळे यांनी बुधवारी आनंदनगर ठाण्यात दिली. त्यानुसार मध्यरात्री जातपंचायतीच्या लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'दंड भर नाहीतर घृणास्पद शिक्षा करू'; जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
एसपीनी घेतली गंभीर दखल...उस्मानाबादेत हे प्रकरण घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी तातडीने पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पीडित महिलेच्या संपर्कात राहून आरोपी पंचावर गुन्हे दाखल करुन घेतले. शिवाय, असे प्रकार पुन्हा जिल्ह्यात घडणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याच्या सूचनाही पोलिसांना केल्या. त्यामुळे जातपंचायतींना चाप बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे.