नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : पळून जाऊ नये म्हणून एका मूकबधिर कामगारास साखळदंडाने जखडून ठेऊन त्याचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी नळदुर्गजवळील एका ढाब्यावर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढाबाचालक व अन्य दोघांवर सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील चिवरी शिवारात असलेल्या कोहिनूर तांबोळी ढाब्यावर एक मूकबधिर कामगार दोन महिन्यांपासून कामास आहे. तो पळून जाऊ नये म्हणून ढाबामालकाने त्याच्या पायास साखळदंडाने बांधून तंदूर भाजण्याच्या भट्टीवर ठेवत त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, हा प्रकार ढाबाचालकाचा भाऊ हसनलाल रमजान तांबोळी यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी थेट नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून याविषयी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सहायक निरीक्षक जगदीश राऊत व कर्मचारी जितेंद्र कोळी यांनी गुरुवारी दुपारी ढाब्यावर जाऊन पाहणी केली असता, मूकबधिर असलेल्या कामगाराच्या पायात साखळदंड आढळून आला. त्यांनी त्यास यातून मुक्त करीत ढाबाचालक अमिर रमजान तांबोळी, परवीन अमिर तांबोळी व रुखमीनबी रमजान तांबोळी यांच्यावर सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित कामगारासोबत संवादात अडथळा...या घटनेतील पीडित तरुण हा मूकबधिर असल्याने त्याचे नाव-गाव समजले नाही. नळदुर्ग ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी मूकबधिरांची भाषा समजणाऱ्या व्यक्तीस पाचारण केले होते. मात्र, तोही या तरुणाची मूक भाषा समजू शकला नाही. याविषयी राऊत म्हणाले, पीडित तरुणाच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओळख पटल्यानंतर त्यास घरी सोडण्यात येईल.