तुळजापूर : महिलेला प्रसूतीसाठी घेऊन निघालेल्या जीप व ट्रॅव्हल्सचा तुळजापूरच्या बायपास चौकात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात दोघे जण जखमी झाले असून, गर्भवती महिला बालंबाल बचावली. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असला तरी त्याच्याच प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना यात टळली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील एका महिलेला शुक्रवारी सकाळी प्रसूतीसाठी एका खासगी जीपमधून उस्मानाबादकडे नेले जात होते. ही जीप सोलापूर-धुळे महामार्गाच्या बायपासवरील लातूरकडे जाणाऱ्या महामार्गावरील चौकात आली. त्याचवेळी लातूरच्या दिशेने निघालेली एक ट्रॅव्हल्सही या चौकात गतीने आली. या दोन्ही वाहनांची चौकात धडक झाली. या घटनेत जीपमधील चालक नितीन विठ्ठल शिंदे (३२) व अनिता धनाजी मुळे (४०) असे दोघे जण जखमी झाले आहेत. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन केला; मात्र तोपर्यंत जखमींना एका खासगी वाहनाने नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून गर्भवती महिलेस उस्मानाबादला पाठविले. काही वेळाने उस्मानाबाद व लोहारा येथून दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र तेथे कोणीही नसल्याने त्या रिकाम्या परतल्या.
चालकाने राखले प्रसंगावधान...
या अपघातात जीप अचानक समोर आल्याने ट्रॅव्हल्सचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळविले. वेगावर लवकर नियंत्रण मिळविल्यामुळे ट्रॅव्हल्स काही अंतरावर रस्त्यावरच थांबली. अन्यथा पुढे मोठा खड्डा होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र दुभाजकात लावलेला जाड पत्रा तुटून रस्त्यावर आडवा पडला. त्यामुळे तुळजापूरच्या दिशेने येणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. तासाभराने महामार्गाचे काम करीत असलेल्या कंपनीचे कर्मचारी याठिकाणी आले व त्यांनी वाहतूक खुली करून दिली.