तुळजापूर : तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने अर्धशतक पार केले असून, सध्या शहर व तालुक्यातील ५४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. वाढती रुग्णांची संख्या ही शहरवासीयांच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक ठरत आहे. दररोज सात ते दहा रुग्णांची भर पडत असताना प्रशासनाकडून मात्र अपेक्षित उपाययोजना राबविल्या जात नसल्याच्या तक्रारी शहरवासीयांमधून होत आहेत.
सद्यस्थितीत तुळजापुरात उपजिल्हा रुग्णालयांमध्ये १४, आठवडा बाजार भक्त निवासमध्ये १० तर खासगी कोविड सेंटरमध्ये ५ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय होमआयसोलेशनमध्ये २५ रुग्ण आहेत. चालू आठवड्यात तालुक्यात ६० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून, उर्वरित रुग्ण उस्मानाबाद व सोलापूर या ठिकाणी उपचार घेत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कागदोपत्री मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या दिसत असली तरी प्रत्यक्षात बहुतांश वेळा एखादेच डॉक्टर येथे हजर असतात. ओपीडीतील संध्याकाळचा सर्व कारभार परिचारिका व वाॅर्ड बाॅयवर चालतो. उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे कामकाजावर अंकुश राहिलेला नाही. यासाठी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनानेदेखील शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता स्वच्छता, सफाई, निर्जंतुकीकरण फवारणी आदी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
चौकट.........
तज्ज्ञांअभावी यंत्रणा धूळखात
उपजिल्हा रुग्णालयात मोठा गाजावाजा करून रक्तपेढी चालू करण्यात आली. यासाठी एका तज्ज्ञ डॉक्टरांची व एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, रक्तपेढी डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले व या ठिकाणची रक्तपेढी बंद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त रुग्णालयात आणखीनही बरीच तपासणी यंत्रे तज्ज्ञांअभावी बंद अवस्थेत आहेत.