शाळा नोंदणीस दिली मुदतवाढ
उस्मानाबाद : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी स्वतः फिट इंडियाच्या पोर्टलवर जाऊन करायची आहे. यासाठी आता २७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी त्वरित उपरोक्त उपक्रमासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.
घाणीचे साम्राज्य
येडशी : येथे चौरस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी प्लास्टिक पिशव्या, चहाचे कप व इतर घाण व्यावसायिक टाकत आहेत. यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छता करण्यासोबतच व्यावसायिकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
कागदपत्रांसाठी गैरसोय
भूम : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गावा-गावात इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरु आहे. असे असतानाच महसूल प्रशासनाकडून वेळेत विविध कागदपत्रे मिळत नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी आडचण होत आहे. त्यामुळे महा-ई सेवा केद्रांत कागदपत्रासाठी अर्ज दाखल केल्यानंतर दोन दिवसांत ही कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी इच्छूक उमेदवारांमधून होत आहे.
प्रवाशांची गैरसोय
भूम : येथील बस स्थानकातील परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरातील डांबरीकरण उखडल्याने बस स्थानकात बसेस फलाटावर लावताना प्रवाशांना धुळीचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानक परिसरात डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
शस्त्रक्रिया शिबीर
तेर : येथील येथील ग्रामीण रूग्णालयात प्रत्येक आठवड्याला ३ टाक्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षका डॉ. नागनंदा मगरे यांनी दिली. कोरोना संसर्गामुळे रूग्णालयातील शस्त्रक्रियागृह बंद होते. परंतु, आता ते सुरू झाले असल्याने ग्रामीण रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी करण्यासाठी गरजुंनी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. मगरे यांनी केले आहे.