धाराशिव : शासकीय नोकरभरतीच्या कंत्राटीकरणावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यावर आरोप करीत आहेत. जर हा निर्णय त्यांच्या सरकारचा नसेल तर तो अंमलात आणण्याची घाई का केली, इतर कामांना दिलेल्या स्थगितीप्रमाणे याला का नाही स्थगिती दिली ? मुळात भरतीसाठी यांनी नियुक्त केलेल्या ९ एजन्सी या भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांच्या असून, त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.
अंबादास दानवे हे शुक्रवारी तुळजापूर व धाराशिव दौऱ्यावर होते. त्यांनी धाराशिवच्या मेडिकल कॉलेजमधील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी औषधी तसेच इतर सुविधांचा पुरेश्या नसल्याचे निदर्शनास आल्याने सरकारवर त्यावरुन टीका केली. जिल्ह्यातील आरोग्यमंत्री असतानाही ही स्थिती असेल तर राज्याचे काय चित्र असेल, याची कल्पना यावी. तुळजापूर येथे नियोजित महाआरोग्य शिबीरासाठी राज्यभरातील रुग्णालयांतून औषधी मागवली जात आहेत. याला आम्ही विरोध केला आहे. अशा पद्धतीने इतरांकडील औषधी कमी करण्याऐवजी स्वतंत्रपणे निधीची तरतूद करुन घेणे गरजेचे आहे.
ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात...ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मंत्री दादा भुसे यांनीच मातोश्रीवर आणले होते. तो त्यांच्यासोबतच बाहेर पडला. मुळात तो अटकेत असतानाही ९ महिन्यांपासून ससूनमध्ये आराम करीत होता. याला जबाबदार देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते नाही का, ससूनचे प्रशासन नाही का, असे प्रत्युत्तर फडणवीस यांच्या टीकेला दानवेंनी दिले.