तुळजापूर -येथील नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत सुमारे ५३ काेटी ९४ लाख ३५ हजार रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. ही सभा नगराध्यक्ष सचिन राेचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
नगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी बोलविण्यात आली होती. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली २०२१-२२ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात महिला व बालकल्याणसाठी तसेच दिव्यांगासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीय कल्याण निधीसाठी ५ लाख रुपये, रमाई आवास योजनेसाठी ५० लाख रुपये, पंतप्रधान आवास योजना करता ४ कोटीची तरतूद केली आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधक लस खरेदीसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर अन्य उपाययाेजनांसाठी २५ लाख रुपये ठेवले आहेत. शिलकी अंदाजपत्रकात जमा बाजूस उत्पन्न, अनुदाने संकीर्ण रक्कम आदी मिळून ५३ कोटी ९८ लाख ९० हजार रुपये जमा दाखविण्यात आले आहेत. तर खर्च बाजूस ५३ कोटी ९४ लाख ३५ हजार रुपये दाखविले आहेत. या सभेस नगरसेवक, अधिकारी उपस्थित हाेते.