तुळजापूर ( उस्मानाबाद) : श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील गाभा-यासमोरून एका महिला भाविकाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणात तुळजापूर पोलिसांनी आणखी एका महिलेला जेरबंद केले़ ही कारवाई १० डिसेंबर रोजी सोलापूर येथे करण्यात आली असून, चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़
हैद्राबाद येथील सुशिला नागेंद्र वाहुत्रे ही महिला ३ डिसेंबर रोजी तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी आली होती़ तुळजाभवानी मंदिरातील गाभारा परिसरात त्या आल्या असता अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपए किंमतीची तीन तोळ्याची सोन्याची चैन चोरून घेतली़ यावेळी वाहुत्रे यांनी सुनिता अंबादास गायकवाड (रा़सोलापूर) या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ तसेच चोरी प्रकरणात फिर्याद दिली़ गुन्हा दाखल झाल्यानंतर तुळजापूर पोलिसांनी सुनिता गायकवाड यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली होती़
सुनिता गायकवाड या पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी केलेल्या चौकशीत काळ्या जाधव (रा़सोलापूर) याचे नाव समोर आले होते़ पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली होती़ मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सोलापूर शहर गाठून तीन दिवस तळ ठोकला़ सोलापूर पोलिसांच्या मदतीने काळ्या जाधव याच्या रामवाडी परिसरातील घरावर १० डिसेंबर रोजी छापा मारला़ त्यावेळी अर्चना जाधव या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले़ तिची सीसीटीव्ही फुटेजद्वारे पडताळणी करता तिने या चोरीच्या गुन्हात सहभागी असल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले़ तर तिचा पती काळ्या जाधव हा फरार आहे़ पोलिसांनी अर्चना जाधव हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ पोलीस तपासामध्ये ११ डिसेंबर रोजी चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोनि संजय बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि योगेश खटाने, पोहेकॉ आनंद गायकवाड, पोकॉ रवींद्र मंगरुळे, यादव व महिला पो.कॉ मुजावर यांनी ही कामगिरी केली.