धाराशिव : महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र सादर केले. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या स्वत:कडे साडेचार कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. तर त्यांचे पती आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे जवळपास ४० कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी अर्चना पाटील यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला आहे. त्यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडील संपत्तीचे विवरण सादर केले आहे. यानुसार त्यांची सुमारे साडेचार कोटींची चल-अचल संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. पती राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडेही जवळपास ४० कोटींची संपत्ती आहे. दोघांवरही एकत्रित जवळपास साडेसहा कोटी रुपयांचे कर्ज आहे.
चल संपत्ती : ३.१० कोटीअर्चना पाटील यांच्याकडे एकूण ३ कोटी १० लाख रुपयांची चल संपत्ती आहे. तर पती राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे ९ कोटी ६५ लाख रुपयांची चल संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रातून सादर करण्यात आले आहे.
अचल संपत्ती : १.४७ कोटीअर्चना पाटील यांच्याकडे शेती, अकृषी जागा अशी सुमारे १.४७ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्या मालकीच्या चार एकर जागेचे चालू मूल्य १ कोटी ३१ लाख इतके आहे. पती राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे ३० कोटी २८ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे.
६७ लाखांचे कर्ज घेतले...अर्चना पाटील यांच्यावर ६६ लाख ९५ हजारांचे कर्ज आहे. तर पती राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर ५ कोटी ७८ लाखांचे कर्ज आहे.
साडेतीन किलो सोने...अर्चना पाटील यांच्याकडे ३ किलो ६३९ ग्रॅम इतके सोने असून, एकही वाहन अथवा घर त्यांच्या मालकीचे नाही. पतीकडे १२७ ग्रॅम सोने असून, कुलाबा येथे एक, तर नेरूळ येथे तीन फ्लॅट आहेत.
पती, सासऱ्यांकडून घेतले उसने...अर्चना पाटील यांनी पती राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून ५० लाख ६५ हजार रुपये, तर सासरे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून १३ लाख १० हजार रुपये उसने घेतले आहेत.