धाराशिव : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकास आराखड्यात दर्शन मंडप हे घाटशीळ भागात नियोजित केले आहे. यामुळे पुजारी, व्यापारी संतप्त झाले असून, त्यांनी बुधवारी तुळजापूर बंदची हाक दिली. या बंदला सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद दिसून आला.
तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे साडेतेराशे कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. याअनुषंगाने प्रशासनाकडून प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये दर्शन मंडप हे सध्याच्या ठिकाणी नव्हे तर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घाटशीळ परिसरात दर्शविण्यात आले आहे. यामुळे भाविकांची गर्दी घाटशीळ भागात होईल. परिणामी, मंदिरासमोर असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर संक्रात येणार आहे. बाजारपेठेवरही विपरीत परिणाम होणार असून,भाविकांचीही मोठी गैरसोय होणार असल्याचा दावा करीत पुजारी, उपाध्ये, सेवेकरी मंडळ तसेच व्यापारी, नागरिकांकडून बुधवारी तुळजापूर बंद पुकारण्यात आला आहे.
बंदला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद व अन्य साहित्य मिळू शकले नाही. अल्पोपहार व जेवणासाठीही तारांबळ उडाली. दरम्यान, पुजारी मंडळाकडून प्रशासनाला सद्बुद्धी मिळू दे, असे देवीला साकडे घालत सकाळी महाद्वारावर महाआरती करण्यात आली.