उस्मानाबाद - गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड महामारीच्या गंभीर स्थितीत आर्ट ऑफ लिव्हिंगने ‘मिशन जिंदगी’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. माध्यमातून सोमवारपासून ७ सेवा विनामूल्य दिल्या जाणार आहेत. यासाठी एक वेब लिंक व टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासोबतच आध्यात्मिक पाठबळ देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था कार्यरत आहे. त्याचा भाग म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनात संस्थेने संपूर्ण भारतभर मिशन जिंदगी या सेवा उपक्रमाची गुरुवारी घोषणा केली. मदतीचा हात म्हणून या उपक्रमाद्वारे ७ सेवा जनतेसाठी येत्या सोमवारपासून विनामूल्य उपलब्ध राहणार आहेत. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेबसाईटवर मिशन जिंदगी यासह ०८०६७६१२३३८ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक देशभरातल्या अनेक शहरांत कोविड-१९ च्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी युद्धपातळीवर सेवा देत आहेत. सोमवारपासून विस्तृतपणे उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकत्रितरीत्या प्रयत्न केले जाणार आहेत.
चाैकट...
काय असतील सात उपक्रम
हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे किती बेड्स उपलब्ध आहेत, त्यांची अद्ययावत माहिती देणे, ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्सेंट्रेटरसाठी देणग्या मिळविणे आणि त्यांच्या उपलब्धतेची माहिती पुरविणे, आणीबाणीच्या वेळी अॅम्ब्युलन्स मिळवून देणे, सौम्य कोविड लक्षणे असलेल्या व गृहविलगीकरणातील रुग्णांना गरज पडेल तेव्हा सल्ला घेेण्यासाठी डॉक्टरशी संपर्क करून देणे, स्थानिक पातळीवर जेवण पुरवणारे लोक मिळवून देणे, आयुर्वेदिक औषधे पुरविणाऱ्यांशी संपर्क करून देणे, सर्व वयोगटासाठी समुपदेशन तसेच ध्यान आणि योग शिबिरे घेण्यात येणार आहेत.