उस्मानाबाद : जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षकांचे गेल्या आठ वर्षापासून बंद केलेला वाहन भत्ता पूर्ववत करण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिंगोली आश्रमशाळेतील सहशिक्षक सतीश कुंभार यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे़
यावेळी उपोषण कर्त्यांनी सांगितले की, राज्यातील इतर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित वाहनभत्ता अदा केला जात आहे़. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता सहाय्यक उपआयुक्त सामाजिक न्याय विभागाने गेल्या आठ वर्षापासून बंद केला आहे़ वाहन भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने, पाठपुरावा केला जात आहे़ परंतु प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे़ वाहन भत्ता पूर्ववत झाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचा इशाराही यावेळी सतीश कुंभार यांनी दिला आहे़