भूम तालुक्यात ईट हे गाव सर्वांत मोठे गाव असून, येथे मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील सतरा ते अठरा गावाच्या लोकांना नियमित व्यवहारासाठी येथे यावे लागते. गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास आहे. येथे वीज पुरवठ्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्र असून, या ठिकाणी सिंगल व थ्री फेजच्या डीपी उपलब्ध आहेत. परंतु, या अपुऱ्या पडत असल्याने यावरून गावातील वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांना व व्यापाऱ्यांना सुरळीत व उच्च दाबाने वीज पुरवठा होत नाही. येथील विजेचा प्रश्न सोडवावा, यासाठी अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला; परंतु या कामाकडे डोळेझाक होत आहे.
दरम्यान, गावासाठी गाव फिडर, नवीन डीपी बसवून सुरळीत व उच्च दाबाने वीज पुरवठा मिळण्यासाठी निधीची गरज आहे. या अनुषंगाने आवश्यक निधी मिळावा, अशी मागणी माजी उपसरपंच प्रवीण देशमुख यांनी या निवेदनात केली आहे.