उस्मानाबाद : शासनाकडून मिळालेल्या सिलिंग शेतजमिनीवर केलेली बेकायदेशिररित्या नोंद रद्द करावी, शेतजमीन परत मिळावी, या मागणीसाठी मंगरूळ येथील शेतकऱ्यांसह महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पाच जणांना ताब्यात घेतले़
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील सुधाकर शंकर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी विविध मागण्यांचे निवेदन दिले होते़ पवार यांच्यासह सहा जणांना कसई शिवारात शासनाकडूेन १६ एकर ४ गुंठे जमीन सिलिंग वाटप झाली आहे़ तुळजापूर येथील तहसीलदारांनी जमिनीवर जाऊन जमिनीचा कब्जा दिला आहे़ मात्र, दोघांनी संगणमत करून सहा जणांच्या नावावर असलेली सातबारा नोंद रद्द करून ती जमीन स्वत:च्या नावावर बेकायदेशिरित्या केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता.
ही नोंदणी रद्द करून जमीन परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती़ मात्र, मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सुधाकर पवार यांच्यासह इतर दोन शेतकरी, दोन महिला अशा पाच जणांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ मागण्या मान्य होत नसल्याने हातात डिझेलची बाटली घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी उपस्थित पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांसमवेत चर्चा करून चौकशीचे आश्वासन दिले़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर आनंदनगर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली़