उस्मानाबाद : गेल्याच आठवड्यात अहमदनगर जिल्ह्याीतल शेवगाव येथे एका एसटी कर्मचाऱ्याने फाशी घेऊन आपली जीवनयात्री संपवली होती. पगारवाढ आणि विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेले आंदोलन थाबविल्यानंतरही कर्मचाऱ्यात वेतनावरून असंतोष आहेच. यंदा महामंडळाने दिवाळीमुळे १ तारखेलाच पगार केल्या आहेत. ते अपेक्षेपेक्षा कमी आल्याने नाराज झालेल्या उस्मानाबाद आगारातील एका चालकाने मंगळवारी सायंकाळी आगारातच आतमदहनाचा प्रयत्न केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलीनीकरणाच्या मुद्यावरून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून एसटीचा गाडा रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यातील असंतोष मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. सोमवारीच कळंब आगारातील एक चालक गळफास घेण्यासाठी झाडावर चढला होता. त्यापाठोपाठ मंगळवारी उस्मानाबाद आगारातील चालकाने असाच प्रयत्न केला. यावेळी दिवाळसणामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारी १ तारखेलाच केल्या आहेत. सोमवारी प्राप्त झालेली पगार पाहून चालक ए.पी. नरवडे हे नाराज झाले. त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार आल्याची सल मनात ठेवून त्यांनी मंगळवारी सायंकाळी आगार गाठले. यानंतर आगारप्रमुखांच्या कार्यालयासमोर थांबून अचानकच अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हा प्रकार शेजारीच काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ धाव घेत नरवडे यांना पेटवून घेण्यापासून रोखले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
उस्मानाबाद आगारातील चालक नरवडे हे पगारीवरून नाराज झाले होते. त्यांची तातडीने भेट घेऊन वाढीव पगार हा ७ तारखेपर्यंत जमा होणार असल्याचे सांगितले. त्यांची समजूत काढल्यानंतर नरवडे यांना घरी पाठविण्यात आले. सर्वांचेच पगार वेळेत व ठरल्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कोणीही टोकाची पावले उचलू नयेत.- अमृता ताह्मणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद