तुळजापूर (जि. धाराशिव) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना ‘ नो एन्ट्री’ करण्यात आली होती. तसे फलक मंदिर परिसरात जागोजागी लावण्यात आले होते. नंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय मागे घेण्यात आला.
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती.
या कपड्यांवर होते निर्बंध जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशाेभनीय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बर्मुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ही माहिती भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंदिर परिसरात याबाबतचे फलकही लावले होते. गुरुवारपासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली होती.
मंदिराची शालीनता कायम राहावी, यासाठी भाविकांना कपड्यांबाबत असा तोंडी निर्णय घेतला गेला होता. रेकॉर्डवर असा निर्णय नसल्याचे लक्षात आल्यानंतर कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रगटन आपण काढले आहे. - सौदागर तांदळे, - तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक
लावले होते फलक मंदिरात येताना भाविकांचा ड्रेसकोड काय असावा याबाबत भाविकांना आवाहन करणारे असे फलक लावले होते.