उस्मानाबाद : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाईप पुरविण्याची योजना हाती घेण्यात आली होती. परंतु, कृषीसोबतच अन्य विभागांकडूनही पाईप पुरविण्यात येतात. त्यामुळे हा निधी मागासवर्गीय विद्यार्थिनींना सायकल वाटपासाठी वळविण्याचा निर्णय गुरूवारी विषय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुनर्नियोजनातून २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
पूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना एका गावातून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी शिक्षण विभागाकडून सायकलींचे वाटप केले जात होते. त्यामुळे शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थिनींना खाजगी वाहने अथवा बसेसची प्रतीक्षा करावी लागत नव्हती. शाळेच्या वेळेत वाहनांची सोय नसलेल्या मुलींनाही पायपीट करावी लागत नसे. परंतु, काही वर्षापूर्वी संबंधित विभागाने सायकलींच्या वाटपाची योजनाच गुंडाळली. सध्या कुठल्याही विभागाकडून सायकलींचे वाटप केले जात नाही. दरम्यान, सायकल वाटपाची योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक पालकांतून होत होती. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतील समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी गुरूवारी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय शेतकऱ्या ंना पाईप पुरवठा करण्यात येत आहेत. परंतु, कृषीसोबतच इतर योजनांतूनही अशा प्रकारचे पाईप दिले जात आहेत. त्यामुळे समाजकल्याणकडील ही योजना बंद करून त्यासाठीचा २७ लाखांचा निधी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ठेवावा, असे सांगितले. त्यास सर्वच सदस्यांनी सहमती दिली. त्यामुळे वाहतुकीच्या साधनांअभावी शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थिनींची होणारी पायपीट आता दूर होणार आहे.
दप्तर, वह्यांसाठी ७ लाख रूपयेग्रामीण भागातील अनेक मागासवर्गीय कुटुंबांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे ते आपल्या मुलासाठी वेळेवर दप्तर व वह्या खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातील निधीच्या पुनर्नियोजनातून सात लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या रक्कमेतून पात्र विद्यार्थ्यांना उपरोक्त साहित्य पुरविले जाणार आहे. हाही निर्णय विषय समितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाची योजना हाती घ्यावी, अशी मागणी अनेक पालक माझ्याकडे करीत होते. त्यामुळे सेस फंडाच्या पुनर्नियोजनातून विद्यार्थिनींना सायकलींच्या वाटपासाठी २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचे वाटप करण्यासाठी ७ लाख रूपये ठेवले आहेत. गरज भासल्यास आणखी तरतूद वाढविली जाईल.- दिग्विजय शिंदे, सभापती, जिल्हा परिषद.