धाराशिव : एप्रिलमध्ये सातत्याने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यामध्ये ५ हजार ९३० शेतकऱ्यांचे शेतपिकांचे; तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल नुकताच तयार केला. यामध्ये ३ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळीने बाधित झाली. भरपाईसाठी प्रशासनाने ५ कोटी ६१ लाखांच्या निधीची मागणी शासनाकडे पाठविली असून, आता त्या मदत निधीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
यंदा मार्च पाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळी, गारपीट झाली. त्यामुळे बागायत व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले होते. महसूल विभागासह वेगवेगळ्या यंत्रणांनी यासाठी पंचनामे केले. यानंतर अहवाल प्रशासनाने तयार केला. अहवालानुसार जिल्ह्यातील ८५३ हेक्टर २७ आर जिरायत पिकांचे, २ हजार २११ हेक्टर १० आर बागायत पिकांचे, तर ५०० हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ५ कोटी ६१ लाख १ हजार १७० रुपयांची मागणी केली आहे.