अणदूर : कोरोनाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने गावातच शेतकऱ्यांची पीक कर्जाची कामे व्हावीत, यासाठी तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, नळदुर्ग शाखा यांच्या वतीने ‘आपली बँक आपल्या गावी’ ही मोहीम राबविण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच मीरा घोडके होत्या. यावेळी कार्यक्षेत्र अधिकारी निर्माण पारकर, सुखविंदर सिंग, मेघना तेंडुलकर, नीलकंठ राठोड, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन घोडके, ग्रामसेवक एम. सी. निलगार, उपसरपंच खाजाबी पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गतवर्षी गुळहळ्ळी येथील शेतकऱ्यांना १ कोटी ४७ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यानुसार यावेळी पीक कर्ज नवे-जुने करणे, कर्ज वाढवून देणे, शासनाच्या नवीन धोरणानुसार व्याजदरात वर्ग करणे, अटल पेन्शन, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढणे आदी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. सूत्रसंचालन गुंडू पटेल यांनी केले तर आभार अरविंद पाटील यांनी मानले.