उस्मानाबाद : संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने बार उघडले आहेत. परंतु अनेक वेळा विनंती करूनही मंदिरांसह प्रार्थनास्थळे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. सरकारच्या या धोरणाविरोधात मंगळवारी भाजपाच्या वतीने जिल्हाभरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवी व उस्मानाबादेत धारासूर मर्दिनी मंदिराच्या प्रवेशद्वारात हे आंदोलन झाले. यावेळी ठाकरे सरकारविरोधात दिलेल्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता.
राज्यात मागील कित्येक महिने मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे संबंधितांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. इतर राज्यांमध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळे चालू आहेत. मग महाराष्ट्रामध्येच बंद का? असा सवाल भाजपाकडून करण्यात आले. मंदिरे बंद असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शहरातील धारासूर मर्दिनी मंदिराच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिला.
यावेळी ‘ठाकरे सरकार हाय-हाय, उध्दवा अजब तुझे सरकार’ आदी घोषणा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणांमुळे मंदिर परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरीताई गरड, चिटणीस आशाताई लांडगे, मंजुषाताई कोकीळ, विनायक कुलकर्णी, विनोद गपाट आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.