बाबू खामकर
पाथरुड : शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने मागील हंगामापासून शेतकऱ्यांना बीबीएफ रूंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. याचा चांगला फायदा या हंगामात दिसून येत आहे.
या परिसरात खरीप हंगामात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु, निसर्गाच्या भरवशावरच कोरडवाहू शेती, पावसाची अनियमितता, दिवसेंदिवस उत्पादन खर्चात होत असलेली वाढ अन् उत्पन्नातील घट यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. ईट कृषी मंडळात मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून पहिल्यांदाच बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतावर यंत्र जोडणी ते पेरणी पर्यंत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. याचा फायदा घेऊन काही शेतकऱ्यांनी या नवीन पद्धतीचा अवलंब देखील केला. मागील वर्षी जवळपास १०० एकर क्षेत्रावर अशी पेरणी झाली. यातून आलेल्या चांगल्या अनुभवामुळे या हंगामात जवळपास हजाराहून अधिक एक क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी झाली आहे. यासोबतच या हंगामात कृषी विभागाने पुढाकार घेऊन जवळपास २५ एकर क्षेत्रावर टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडीचाही प्रयोग केला आहे.
बीबीएफ यंत्र उपलब्धता कमी असल्याने पारंपरिक पेरणी यंत्राला फाळ बसवून तसेच पेरणी यंत्राचा एक नळा बंद करून स्थानिक परिस्थितीनुसार बीबीएफ पद्धत करण्यासाठी कृषी विभागाने घेतलेल्या प्रयत्नाला यश आले व मोठ्या क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी शक्य झाली. बैल चलित तिफणीने सुद्धा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविल्याने तेही क्षेत्र या हंगामात वाढले आहे. सुरुवातीला या नवीन तंत्रज्ञानाबाबत अपुरी माहिती, गैरसमज व यंत्राची अनुपलब्धता यामुळे शेतकरी याचा अवलंब करण्यास सकारात्मक नव्हते. परंतु, प्रत्यक्ष अनुभव व उत्पन्न वाढ पाहून अधिकाधिक शेतकरी बीबीएफ तसेच टोकन पद्धतीकडे वळताना दिसत आहे.
कोट.....
बियाणे बचत, अतिरिक्त पाण्याचा सरीमध्ये निचरा, पावसाच्या खंडात गादी वाफ्यावर ओलावा टिकून राहणे, मोकळ्या ओळीतून सुलभतेने फवारणी करणे, मुबलक सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिल्याने पिकाची जोमदार वाढ होणे, उत्पादनात एकरी २ ते ३ क्विंटल हमखास वाढ आदी फायद्यांचा प्रत्यक्ष अनुभवामुळे शेतकरी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्यास सकारात्मक आहेत.
- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी, ईट