उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धूळ खाली बसतोय न बसतोय तोच आता तिसऱ्या लाटेची घंटा वाजलीय. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारावर पोहोचलीय. शिवाय,जिल्ह्यातील ३३ गावे धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत. (33 villages in Osmanabad district on the verge of danger, active number of corona patients in thousands ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात निर्माण केलेला उद्रेक सर्वांनी जवळून अनुभवला आहेच. तरीही काळजी घेण्याची तसदी कोणी घेत नसल्याचे दिसून येत आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच आता सवलतीमध्ये आणखी मुभा मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून दररोज रुग्णसंख्या शंभरीच्या आसपास फिरतेय. आजघडीला जिल्ह्यातील ३३ गावात ५ पेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
कुंभेजा, खासापुरीत उद्रेक... सध्या परंडा तालुका डेंजर झोनमध्ये दिसतो आहे. या तालुक्यातील ८ गावांत पाचहून अधिक रुग्ण आहेत. येथील कुंभेजा गावात ३१ तर खासापुरीत ३० रुग्ण आहेत. याशिवाय, उस्मानाबाद तालुक्यातील ८, वाशी ७, भूम ३, कळंब, लोहारा, तुळजापूर तालुक्यात प्रत्येकी २ तर उमरगा तालुक्यातील एका गावात पाचहून अधिक रुग्ण आहेत.
- तर या गावात कंटेन्मेंट झोन : जिल्हाधिकारी जिल्ह्यातील ३३ गावांत सध्या पाचहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या गावात टेस्ट वाढविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. यानंतरही संबंधित गावातील रुग्णसंख्या कमी होताना दिसली नाही तर येत्या २-३ दिवसात तेथे कंटेन्मेंट झोन लागू करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.