उस्मानाबाद : सध्या पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहेत. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काही जणांच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. गेलात तिथे सुखी रहा, अशी भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत, विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, याची नोंद पक्ष घेत नाही, असे त्यांना वाटत असेल. दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटत असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर त्यांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.
यानंतरही पदावर राहणे, हा त्यांचा निर्णय राज्यपालानी स्वतःच्या पदाची व मुख्यमंत्री पदाची किंमत ठेवावी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केलीय. यानंतरही पदावर राहावे वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, अशी अप्रत्यक्ष टीका पवारांनी केली. मुख्यमंत्रीही पाहणी दौऱ्यावर येत आहेत. ते बाहेर पडत नाहीत असे नाही, आम्हीच त्यांना सांगितलंय एका ठिकाणी बसून नियोजन करायला, असे सांगत ठाकरे यांची पाठराखण केली.