उस्मानाबाद : जिल्ह्यात गूढ आवाजाची श्रृंखला सुरूच आहे़ मागील १५ दिवसांत चार वेळा जोरदार आवाजाने जिल्हा हादरला आहे़ मंगळवारी दुपारी पुन्हा जोरदार आवाजासह कंप झाला़ या आवाजाचे गूढ प्रशासनालाही उकललेले नाही़ हा भूकंप नव्हता, हे निश्चित असले तरी सर्वसामान्यांमध्ये भीतिचे वातावरण आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने गूढ आवाज होत आहेत़ मंगळवारी दुपारी १़४० वाजता असा जोरदार आवाज होऊन जमीन चांगलीच हादरली़ मागील १५ दिवसांतील हा चौथा प्रकार आहे़ या घटनेने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत़ कोणी भूकंप म्हणून अफवा उठवितात, तर कोणी स्फोट झाल्याची अफवा़ पसरवितात.ध्वनी वेगापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या सुपरसॉनिक विमानांच्या द्वारेही असे सॉनिक बूम घडतात़ त्याचा हा आवाज असल्याचा दावा करण्यात येत आहे़ दरम्यान, लातूरच्या भूकंपमापन केंद्रावर हादऱ्याची कसलीही नोंद मंगळवारी किंवा पूर्वी झालेली नाही़ हे नेमके काय, याचा खुलासा अद्याप प्रशासकीय पातळीवरुन झाला नाही.
गूढ शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशीलआवाजाविषयी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या प्रकाराची माहिती मिळविण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविल्याचे सांगितले़ शिवाय हा प्रकार भूकंपाचा निश्चितच नव्हता़ आवाजाचे गूढ शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ या प्रकाराबद्दल भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
६ नोव्हेंबर : गेल्या पंधरा दिवसांत ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान उस्मानाबाद परिसराला गूढ आवाजाचा जोरदार हादरा बसला.११ नोव्हेबर : सायंकाळी ४.३७ वाजता उस्मानाबाद, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यात गूढ आवाजाचे पुन्हा हादरे जाणवले.१४ नोव्हेबर : सकाळी १०.१५ वाजता भूम, कळंब, वाशी, परंडा तालुक्यात जोरदार आवाज झाला.