लोकमत न्यूज नेटवर्क
भूम : तालुक्यात कोविड लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या लाखाच्या घरात असताना, आजपर्यंत लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांचा आकडा मात्र केवळ काही हजारांच्या घरात आहे. केवळ लस उपलब्ध होत नसल्याने हे काम संथगतीने सुरू असून, याला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
तालुक्यात सुरूवातीच्या काळात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने तसेच दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये या आजाराबाबत चांगलीच भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत. परंतु, दुसरीकडे शासनाकडून अपेक्षित लसींचा पुरवठा होत नसल्याने यावर आता मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर हेलपाटे मारत असल्याचे दिसत आहे.
भूम ग्रामीण रुग्णालयांतर्गत आतापर्यंत ४५ वर्षांवरील ५ हजार ७०७ नागरिकांना कोविशिल्ड तर २ हजार ५१८ नागरिकांना कोव्हॅक्सिनची लस टोचण्यात आली. याशिवाय १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ८८६ लाभार्थ्यांनाही लस मिळाली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत आतापर्यंत केवळ ११ हजार ७११ जणांचे लसीकरण झाले आहे.
तालुक्यात सध्या पाच-सहा ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, रुग्णसंख्या वाढतच असल्याचे प्रशासन आणखी जागांचा शोध घेत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढविल्यास रुग्णसंख्या व मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.
चौकट.........
दोन हजारांवर नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत सद्यस्थितीत जवळपास दोन हजार नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी ते दररोज केंद्रावर चकरा मारत आहेत. यात ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. शिवाय, अनेकजण पहिला डोस मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसून, ती उपलब्ध होताच लाभार्थ्यांना देण्यात येईल, असे सांगितले.
कोट.........
मी ८ एप्रिल रोजी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. यानंतर दुसऱ्या डोससाठी चकरा मारत आहे. परंतु, प्रत्येकवेळी लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते.
- चंद्रशेखर देशमुख, भूम