दुधाचे भाव वाढविण्याची मागणी
भूम : दुधाचे भाव वाढवावेत, अशी मागणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी चांगल्या प्रतीच्या दुधाला २९ रुपये प्रति लिटर दर होता. परंतु, सध्या प्रति लिटर २५ रुपये दर मिळत असल्याने दूध उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. जनावरांच्या खुराकाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दुधाचे दर वाढवावेत, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.
पाईपलाईनला गळती
भूम : शहरातील इंदिरानगर भागातील सुपनर येथील नगर पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळील पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांमधून होत आहे.
माठ विक्रीस फटका
भूम : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे माठ विक्रीस फटका बसला आहे. यातून मिळणारे उत्पन्न घटले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठास चांगली मागणी असते. परंतु, लॉकडाऊनमुळे तालुक्यातील सर्वच आठवडा बाजार बंद झाल्याने मोठा फटका बसला आहे. त्यामुळे माठ विक्रेत्यास शासनाने मदत करावी, अशी मागणी व्यावसायिकांमधून होत आहे.
लसीकरणासाठी कॅम्प लावण्याची मागणी
भूम : शहरातील अनेक नागरिक अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे लसीकरण वेगात व्हावे, यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात नियोजन करून कॅम्प लावावेत. जेणेकरून लसीकरणास प्रतिसाद मिळेल. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवून शहरातील विविध भागांत लसीकरणाचे कॅम्प लावावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.