(फोटो : बालाजी आडसूळ १८)
कळंब : तालुक्यातील बहुला येथील मांजरा नदीच्या खोलीकरण कामास मुहूर्त लागला असला तरी हे काम तांत्रिक मापदंडानुसार होत नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिकांनी थेट जलसंधारण खात्याकडे तक्रार केली आहे. सदर काम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने ते योग्य पद्धतीने करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गोदावरी खोऱ्यातील प्रमुख नदी असोलली मांजरा नदी ही तालुक्याची तसेच बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमारेषा बनून प्रवाही होते. कळंब तालुक्यातील बहुला शिवारात ती तालुक्यात प्रवेशित होते. पुढे नदीकाठावर आढळा, खोंदला, आथर्डी, सात्रा, कळंब, भाटसांगवी आदी गावांचा शेत शिवार येतो.
शेती क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नदी मात्र झाडाझुडपात लुप्त झाल्यासारखी दिसत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी प्रवाहमार्गात अनावश्यक भराव निर्माण झाले आहेत. यामुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात अपेक्षित असा पाणीसाठा राहात नाही. याचा शेतीस फटका बसतो.
हाच धागा पकडत सदर नदीचे बहुला हद्दीत सध्या जिल्हा जलसंधारण कार्यालायाच्यावतीने खोलीकरण करण्यात येत आहे. सदर काम करताना तांत्रिक मापदंडानुसार काम होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
रूंदी, खोली, भराव यासंदर्भात अनेक अनियमितता आहेत, असे शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर समोर आले आहे. याची ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे कैफियत मांडल्यानंतर ग्रामपंचायतीने विशेष सभेत या कामाची चौकशी करून काम योग्य पद्धतीने करून द्यावे, असा ठराव घेतला आहे. शिवाय याची जिल्हा जलसंधारण अधिकारी ते मंत्री यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
खोलीकरणात खोलीचा अभाव
यासंदर्भात गावातील आश्रुबा बिक्कड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर जात कोट्यवधी रुपयांच्या तीन कामांची पाहणी केली. यावेळी खोलीची मोजणी केली असता ती फूट ते दीड फूट दिसून आली. याविषयी संबंधितांना बोलूनही काही उपयोग झाला नाही. यामुळे शेवटी याविषयी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. यावर सरपंच आशा बिक्कड, उपसरपंच सुरेश शेळके, सदस्य कमल बिक्कड, स्वाती शेळके, पल्लवी पवार, सुमन यादव, पोपट कोठावळे यांच्यासह अश्रुबा कोठावळे, अनिल कोठावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अद्याप काम पूर्ण नाही
याविषयी जलसंधारण विभागाचे अभियंता काकडे यांच्याशी संपर्क साधला असता सदर गाव शिवारात तीन कामे आहेत. एजन्सीने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. सध्या यंत्रणा नसल्याने तूर्त काम बंद आहे. पुढच्या काही दिवसांत आणखी आवश्यक तेथे काम करुन घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.