उस्मानाबाद : येथील सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ऑनलाइन पद्धतीने श्रावक, श्राविका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यानिमित्त येथील दिगंबर जैन मंदिरात सकाळी सुदेश फडकुले यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करून भगवान महावीर यांचा जयघोष करण्यात आला. श्री १००८ पार्श्वनाथ सै. दिगंबर जैन मंदिरामध्ये शासनाचे नियम पाळून ठराविक श्रवाकांच्या व मंदिर पुजाऱ्यांच्या उपस्थितीत भ. महावीरांच्या प्रतिमेचा पंचामृत अभिषेक, पूजन, भक्ती, पाळणा, आरती करण्यात आली. याचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात आले. शांतीमंत्राद्वारे सर्व जिवांच्या स्वास्थ्याची व कल्याणाची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच कोरोना विषाणू लवकरात लवकर शांत व्हावा यासाठी घरी बसून सामूहिक मंत्रजाप करण्यात आला.
यानिमित्त अन्नपूर्णा अन्नछात्राद्वारे अन्नदान करण्यात आले, तसेच मिष्टान्न प्रसाद वाटप केले. भगवान महावीर यांचा विविध प्रकारे अभिषेक करणे, त्यांचे पूजन करणे, यासाठी विविध चढाव ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. कार्यक्रमासाठी सकल जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते, सुदेश फडकुले, प्रशांत येणेगुरे, अतुल कांबळे, अतुल अजमेरा, कुणाल गांधी, मनोज कोचेटा यांनी पुढाकार घेतला.