तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत शुक्रवारी नागपंचमीदिवशी कोरोना संसर्गाचा धोका ओळखून नागोबा मंदिराचा ताबा पोलिसांनी घेऊन देऊळ बंदचा निर्णय घेतला. दुपारी साडेतीन वाजता मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत गण भाकणूक, पालखी मिरवणूक काढून महाआरतीने यात्रेची सांगता करण्यात आली. नागनाथ महाराज की जय, या घोषाने सावरगाव नगरी दुमदुमली होती.
कोरोनाच्या सावटाखाली सलग दुसऱ्यादिवशी नागोबाची यात्रा शुक्रवारी साजरी करण्यात आली. गुरुवारी दुपारनंतर नागोबा मंदिराचा ताबा घेऊन शुक्रवारी देऊळ बंदचा निर्णय गावकरी व तामलवाडी पोलिसांनी घेतला. त्यामुळे दर्शनाला व देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी भाविकांना जाता आले नाही. मंदिराकडे जाणारे प्रवेशद्वार बंद केल्याने परगावच्या व स्थानिक भाविकांनी भर रस्त्यावर माथा टेकून दुरूनच दर्शन घेतले. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, रमेश घुले यांच्यासह पोलीस कर्मचारी ठाण मांडून होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजता नागोबा मूर्तीस महाभिषेक घालण्यात आला. दुपारी साडेतीन वाजता पुजारी कल्याण स्वामी यांच्या निवासापासून पालखी व मारुती मंदिरातून गणाच्या मिरवणुकीस मोजक्या मानकऱ्यांचा सहभाग घेऊन प्रारंभ झाला. डोके कुटुंबियांनी बनविलेल्या लिंबाऱ्याच्या पाल्याच्या गोलाकार माळा सेवाधाऱ्यांनी परिधान करून ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. सायंकाळी ५ वाजता मिरवणूक मंदिरासमोर येताच कल्याण स्वामी यांना खर्ग डोहात स्नान घालून भाकणूक वर्तविण्यात आली. यानंतर महाआरतीने यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, माजी सभापती संतोष बोबडे, उपसरपंच आनंद बोबडे, सिध्देश्वर तानवडे, बंडू तानवडे, भारत कानवले, हरिदास डोके, पिंटू तानवडे, बत्तास पाटील, नागेश अक्कलकोटे, रमेश लिंगफोडे, बाळासाहेब तानवडे, योगेश काडगावकर, सोमा तोडकरी, विठ्ठल तानवडे, रामलिंग गाभणे, भैया तानवडे, आण्णासाहेब लिंगफोडे, भारत डोके, शंकर डोके, महादेव डोके, गंगाधर गाभणे, मेघा काडगावकर, पोलीसपाटील समाधान डोके आदी उपस्थित हाेते.
चौकट
१६० जणांचे रक्तदान
सावरगाव येथील नागोबा यात्रेनिमित्त शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जि. प. सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, माजी सभापती संतोष बोबडे, सपोनि सचिन पंडित, रमेश घुले, अरविंद भंडगे, सुधीर मगर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. १६० तरुणांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वी करण्यासाठी क्रांती तरुण मंडळ, एस. एम. ग्रुप, आजोबा गणपती मंडळ, धर्मवीर संभाजीराजे ग्रुप, अहिल्यादेवी प्रतिष्ठानने परिश्रम घेतले.
अशी झाली भाकणूक...
नागोबा मंदिरालगत मानकरी केशव डोके यांनी भाकणूक ओट्यावर खरीप व रब्बी हंगामातील धान्याचे ढिगारे मांडण्यात आले होते. त्यात पुजारी कल्याण स्वामी यानी मांडलेल्या धान्याला स्पर्श करून फक्त ज्वारीचे उत्पादन पदरात पडेल व पर्जन्यमान कमी प्रमाणात होईल, असे भाकित वर्तविले.