धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव येथील मांजरा नदीच्या दक्षिणेकडील बाजूस बीडकडे जाणाऱ्या रस्त्याला तीव्र वळण दिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताची मालिका सुरू असते. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सातारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे नवीन कार याच मार्गाने जात होती. ही कार पारगाव येथील या तीव्र वळणाच्या उतारावर आल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कारने चार पलट्या मारल्या. त्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला. सुदैवाने हे वाहन रस्ता कामातून शिल्लक असलेल्या सिमेंट कठड्याला जाऊन अडकले. यात वाहनाचा चक्काचूर झाला. मात्र, त्यातील दोन तरुण सुदैवाने वाचले.
यामुळे टळली मोठी दुर्घटना...
अपघातस्थळाच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सिमेंटचा कठडा पडून आहे. हे वाहन याच कठड्याला जाऊन अडकले. तो कठडा नसता तर कार ३० फूट खोल असणाऱ्या ओढ्यात पडली असती. सुदैवाने कारमधील चालक सूरज बळवंत कोळेकर (२९) व अमित भीमराव बोदरे (२६, दोघेही रा. पाटण जि. सातारा) हे दोघेही सुखरूप बचावले.