अणदूर : तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे ३ एप्रिल रोजी होणारी ग्रामदैवत श्री संत सदगुरु भवानसिंग महाराज यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष असून, मोजक्याच भक्तांच्या हस्ते श्री संत भवानसिंग महाराज यांची विधीवत पूजा करण्यात येणार आहे.
नाथषष्टी निमित्ताने प्रत्येक वर्षी संत भवानसिंग महाराज यात्रा पार पडते. या महोत्सवात श्री नाथ मंदिरासमोर गुलालाचे कीर्तन, अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथून येणाऱ्या श्रींच्या पालखीचे आगमन, यानंतर पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडतात. यात्रेत वारकरी दिंडीचे पाऊल खास आकर्षण ठरते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांचे कार्यक्रम होत असतात. दहीहंडी फोडून काला प्रसादाचे वाटप केल्यानंतर महाप्रसादाने यात्रेची सांगता होते.
दरम्यान, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ३ एप्रिल रोजी होणारी ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सुरेशसिंग परिहार, किसन पाटील, हभप राजकुमार पाटील, शिवाजी मिटकर, राजेंद्र पवार, भालचंद्र यादव, दत्तात्रय सुरवसे, बाबुराव बिराजदार, महादेव बिराजदार, राम यादव, किशोर धुमाळ, दत्ता पाटील, मदन पाटील, एस. के. गायकवाड यांनी कळविले आहे.